ताईंसाठी धनुभाऊ, बप्पांसाठी आ.संदीपभैय्या यांची कठोर परिक्षा
लोकसभेची फाईट आणखीनच टाईट!
बीड । निलेश पुराणिक
बीड लोकसभेचे रणांगण जसे-जसे दि.13 मे मतदानाची तारीख जवळ येत आहे तसे तसे दिवसेंदिवस तापतच आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडण्यात आणि जनतेला आश्वासन देण्यात उमेदवार दिसून येत आहे. विशेष म्हणजे जशी लोकसभा निवडणुकीचे मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तसे बजरंग सोनवणे यांना नेत्यांचा पाठिंबा वाढतांना दिसत आहे तर पंकजाताईंच्या वाट्याला कधी गाडी अडवण्यासारखे प्रकार होत असल्यामुळे ताईंच्या वाट्याला आलेला संघर्ष काही पिछा सोडवायला तयार नाही त्यामुळे या रोमहर्षक निवडणुकीचे चित्र काय स्पष्ट होईल हे सांगणे कठीण असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.
जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी आज रोजी महायुतीचे 5 आमदार आहेत तसेच विधानपरिषद सदस्य देखील आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना पंकजा मुंड यांचे पारडे जड वाटत होते परंतू गेल्या 4 ते 5 दिवसांत बजरंग सोनवणे यांना वाढता प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. तसेच माजीमंत्री सुरेश नवले यांना कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेवून बजरंग सोनवणे यांना सहकार्य करा असे देखील जाहीर सांगितले. सुरेश नवले यांच्या कार्यक्रमाची गर्दी पाहता बजरंग सोनवणेंना पाठिंबा वाढल्याचे दिसत आहे.
बीड लोकसभा मतदारसंघ हा राज्यात नेहमीच धक्कायदायक निकालांसाठी देशात परिचित आहे. विशेष म्हणजे बीड लोकसभा ज्या पक्षाची त्या पक्षाचेच सरकार देशात येते असा यापुर्वी अनुभव होता अपवाद वगळता लोकसभा निवडणुक 2009 चा मात्र त्यानंतर आणि 2009 पुर्वीचा अनुभव हा जो पक्ष बीडमध्ये लोकसभा जिंकतो तोच देशात सरकार बनवतो असा होता/आहे.
बजरंग सोनवणेंचा केजसह बीड व अंबाजोगाई येथील मोठा जनसंपर्क तसेच साखर कारखाने त्यांनी उभारुन मजुरांना आणि शेतकर्यांना हातभार लावण्याचे काम केल्याच बोलले जात आहे.तसेच बजरंग सोनवणे यांच्यासाठी आ.संदीप क्षीरसागर जमेची बाजू असून ते रात्रंदिवस सोबत फिरत आहे त्याच बरोबर बीड जिल्ह्यात पुरोगामी विचाराला मानणारा एक मोठा वर्ग आहे यामुळे दलित आणि मुस्लीम समाज हा बजरंग सोनवणेंसोबत जास्त असल्याचे कॉर्नर बैठकांमधून दिसून येत आहे.
बीड लोकसभेच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे पंकजाताई मुंडे यांची संघर्ष कन्या अशी ओळख आहे त्यांना देखील 2019 ला परळीमधून पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून वारंवार टाळाटाळ केली गेली बीड लोकसभेला पंकजाताई यांना तिकीट देवून मिळाल्यानंतर त्यांना विजयी करण्यासाठी त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे व खा.प्रितमताई मुंडे यांची खंबीर साथ असल्याचे दिसत आहे. ही निवडणुक धनंजय मुंडेंना पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील वर्चस्व तसेच बहीणीला विजयी करण्याची घेतलेली जबाबदारी यामुळे त्यांना संपुर्ण बीड जिल्हा पिंजून काढावा लागत आहे.
बीड लोकसभेसाठी ज्यावेळी पंकजाताई मुंडे यांना तिकीट देण्यात आले होते त्यावेळी त्यांची बाजू भक्कम असल्याची चर्चा होत होती. मात्र आरक्षण प्रश्नाची धग अजूनही कायम आहे त्यामुळे एकवेळा निवडणुक लढवलेले बजरंग सोनवणे आणि माजी मंत्री राहिलेल्या पंकजाताई मुंडे यांच्यात आज तरी काट्याची टक्कर असल्याचे चित्र आहे. दोघेही तुल्यबळ उमेदवार वाटत असल्याने कोणालाही निवडणुक सोपी नसेल नागरिकांचा रोख कधी कोणत्या बाजुने असेल हे आज तरी सांगता येत नसल्याचेच चित्र पहायला भेटत आहे.