ज्योती मेटे सक्रीय राजकारणात

लोकसभा निवडणुक लढण्यावरही ठाम

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्व.विनायकरावजी मेटे यांच्या पत्नी यांनी आज स्व.विनायकरावजी मेटे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करुन आज नौकरीमध्ये स्वइच्छेने निवृत्ती घेत असून कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुक लढणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागा असे सांगत आपली भूमिका जाहीर केली आहे तसेच त्यांनी लोकसभा निवडणुक लढणार असल्याचे सांगितल्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दुसर्‍यांदा महिला विरुद्ध महिला म्हणजे पंकजाताई मुुंडे विरुद्ध ज्योतीताई मेटे अशी लढत होणार आहे यापुर्वी 28 वर्षापुर्वी 1996 साली रजनीताई पाटील विरुद्ध केशरबाई क्षीरसागर यांच्यामध्ये लढत झाली होती ती लढत त्यावेळी भारतीय जनता पक्षाने जिंकली होती.
ज्योती मेटे यांनी आज रोजी स्व. विनायकरावजी मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेत पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली.तसेच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
महविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ज्योती मेटे महविकास आघाडीकडून निवडणूक लढतील की अपक्ष लढतील यात संभ्रम आहे. ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्रामच्या पदाधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक घेतली. यात लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आपण ठाम असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे.
ज्योती मेटे या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. मात्र, असे असतानाच ज्योती मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या ज्योती मेटे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा अपक्ष मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Leave a comment