ईपीएफओचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली । वृत्तसेवा
ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटनेने आधार कार्डबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.आता जन्मतारीख अपडेट किंवा दुरुस्त करण्यासाठी आधार कार्ड वापरता येणार नाही. ईपीएफओने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड वगळले आहे. या संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रकही जारी केले आहे.
कामगार मंत्रालयांतर्गत येणार्या ईपीएफओने आधार वापरून जन्मतारीख बदलता येणार नसल्याचे म्हटले आहे.ईपीएफओने 16 जानेवारीला हे परिपत्रक जारी केले आहे. जन्मतारीख बदलायची असल्यास आधार कार्ड वैध राहणार नाही.ते वैध कागदपत्रांच्या यादीतून काढून टाकण्यात यावे,असे त्या परिपत्रकात नमूद केले आहे.ईपीएफओच्या मते, जन्म प्रमाणपत्र,सरकारी बोर्ड किंवा विद्यापीठाची गुणपत्रिका,शाळा सोडल्याचा दाखला याचा वापर जन्म तारखेतील दुरुस्तीसाठी केला जाऊ शकतो.तसेच सिव्हिल सर्जनचे वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट,पॅन कार्ड आणि मेडिक्लेम प्रमाणपत्र आदींचा वापर करता येऊ शकेल.आधार कार्डचा वापर केवळ ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र म्हणून केला जातो.