काही सोन्याचा गुण काही सवागीचा गुणहरियाणात भाजपाला असा फॉर्म्युला वापरावाच लागणार!

अग्रलेख

येत्या 5 ऑक्टोंंबर रोजी मतदान होत असलेली विधानसभेच्या 90 जागा असलेली हरियाणा विधानसभेची निवडणुक सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांसाठी मोठी परीक्षा असणारी होणार आहे. सत्ताधारी भाजप यावेळी आरएलडी, आप, बसपा, सपा, जेजेपी काँग्रेसचा सुपडा साफ करणार की एचसीएल म्हणजे हुड्डा, छिल्लर, लठवाल या तिघांचा युती फॉर्म्युला भाजपाला पराभूत करणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हरियाणामध्ये राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. यंदाही राज्यात मुख्य लढत भाजपा आणि काँग्रेसमध्ये असल्याचे मानले जात असले, तरी या वेळी निवडणुकीत छोट्या पक्षांची भूमिका फार महत्त्वाची आहे. एका बाजुला हरियाणामध्ये विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. मात्र किसान आंदोलन, अग्निपथ योजना व वाढती बेरोजगारी यांमुळे हा मार्ग खडतर आहे. 2014 मध्ये भाजपाने पूर्ण बहुमताने राज्यात सरकार स्थापन केले. 2019 मध्ये भाजपाचे थोडक्यात बहुमत हुकले त्यामुळे ’जेजेपी’सोबत युती करून सरकार स्थापन करावे लागले. लोकसभा निवडणुकीपूर्वीच जेजेपी- भाजपा युती तुटली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणजे आपल्या माणसांच्या बेजबाबदार बोलण्याने अडचणीची झालेली परिस्थितीमुळे भाजपाच्या जागा देशभरात घटल्या आणि हरियाणात देखील 10 वरून 5 वर आल्या कारण भाजपातील आत्ताच्या नेत्यांना पक्षाचे तत्व, विचारसरणी आणि महत्वाचे म्हणजे कवडी कवडी माया जोडी सारखे म्हणजे एक-एक कार्यकर्ता पक्षश्रेष्ठींनी जोडला आहे याचा विसर पडला तर भाजपाचा कट्टर विरोधी पक्ष असणारा काँग्रेसने खटाखट म्हणत रिवांइड करत मतांची टक्केवारी 29 टक्क्यांवरून 43 टक्क्यांपर्यंत पोहोंचवली. जननायक पार्टी आणि लोकदल हे माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या कुटुंबातील पक्ष आहेत. यामुळे जाट मतदारांचा या दोन्ही पक्षांकडे कल अधिक आहे. हरियाणा सर्वात प्रमुख जाट समाजाचे आहे या मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा भाजपासह सर्वच पक्षांचा प्रयत्न असेल, कारण लोकसभा निवडणुकीत शेतकर्‍यांनी भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. शेतकरी वर्ग हा प्रामुख्याने जाट समाजाचा आहे. जाट आंदोलन, शेतकरी वर्गातील नाराजी, लष्करातील अग्निवीर योजनेमुळे निर्माण झालेला असंतोष भाजपाला त्रासदायक ठरला होता. जाट, दलित आणि मुस्लीम समाज काँग्रेसच्या बाजूने एकवटलेला बघायला मिळाला म्हणूनच लोकसभेत भाजपाला फटका बसून जागा कमी झाल्या. विधानसभा निवडणुकीत हेच चित्र कायम राहिल्यास भाजपाला सत्ता कायम राखण्यात अडचण येऊ शकते असे असले तरी गुरुग्रामजवळील नूह परिसरात बृज मंडल जलाभिषेक यात्रेदरम्यान धर्मांध तरुणांच्या टोळक्याने केलेली दगडफेक, बेबंद हिंसाचार, जाळपोळ यामुळे हिंदू मतदार कमालीचा जागृत झाला आहे. लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता प्राप्त करु न शकलेल्या व जागृत झालेल्या भाजपाने आता आपली रणनीती बदलली आहे. भाजपाने प्रत्येक समाजाला सामावून घेण्यासाठी काही बदल केले आहेत. भाजपाने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या जागी ओबीसी असलेले नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी ब्राह्मण चेहरा मोहनलाल बडोली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे प्रभारी सतीश पुनिया हे जाट समाजातील आहेत त्यामुळे जनता मतदान करेल का नाही हे चित्र स्पष्ट व्हायला घोडा मैदान जवळच आहे. दुसरीकडे हरियाणातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भूपेंद्र सिंग हुड्डा हे केंद्रस्थानी आहेत. त्याशिवाय, कुमारी सेलजा आणि रणदीप सिंग सुरजेवाला हे नेतेदेखील मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. मात्र, पक्षात दोन गट पडले आहेत. एक गट भूपेंद्र हुड्डा व दीपेंद्र हुड्डा यांचा आहे आणि दुसरा गट कुमारी सेलजा आणि सुरजेवाला यांचा आहे. अलीकडेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीच्या दरम्यानच ही दुफळी दिसून आली होती त्यामुळे पक्षश्रेष्ठी देखील नाराज दिसत होते. कुमारी सेलजा यांनी थेट प्रदेशाध्यक्ष उदयभान यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला. सभेत एकाच गटाच्या लोकांना बोलावून प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला. सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना मध्यस्थी करावी लागली. त्याच वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ’हरियाणा मांगे हिसाब’ या नावाने पदयात्रा काढत आहेत; परंतु यामध्ये कुमारी सेलजा आणि रणदीप सुरजेवाला सहभागी झाले नाहीत. त्यांनी आपापले वेगळे मोर्चे काढले. राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना हा वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे.काँग्रेसचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचे सहावे जावई चिरंजीव राव यांनी उपमुख्यमंत्रीपदावर आपला दावा ठोकला आहे. अद्याप तिकीट जाहीर झालेले नसताना हा अजब दावा करण्यात आला आहे. अति-आत्मविश्वास काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे. आम आदमी पार्टीने 2024 ची लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीसोबत लढवली. काँग्रेसला यश मिळाले; परंतु आम आदमी पार्टी मात्र भोपळा फोडू शकली नाही. ’आप’ने आता या वेळी राज्यातील सर्व 90 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. हरियाणात ’आप’ला पक्ष मजबूत आहे आणि भाजपा सरकारच्या विरोधात सत्ताविरोधी भावना आहे, असा आम आदमी पार्टीचा समज आहे. जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे जाट समाजातील प्रमुख चेहरा आहेत. गेल्या विधानसभेपूर्वीच दुष्यंत चौटाला यांनी आपल्या कौटुंबिक पक्ष ’इंडियन नॅशनल लोकदला’तून बाहेर पडून स्वतःचा पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) स्थापन केला होता 2019 मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 10 जागा जिंकून जेजेपी ’किंगमेकर’ म्हणून उदयास आला आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. मार्च 2024 मध्ये भाजपाने सुमारे साडेचार वर्षानी ’जेजेपी’सोबतची युती तोडली. या वेळी जेजेपी विधानसभा निवडणुकीत कोणासोबत युती करणार, हे अद्याप स्पष्ट नाही.भाजपा आणि काँग्रेसव्यतिरिक्त ’आयएनएलडी’ हा हरियाणातील प्रादेशिक पक्ष आहे, ज्याकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याची ताकद आहे. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या नेतृत्वाखाली ’आयएनएलडी’ला ग्रामीण भागात मजबूत प्राबल्य आहे. ’आयएनएलडी’ ने मायावतींच्या बसपासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. ही युती भाजपा आणि काँग्रेसला पर्याय म्हणून तिसरी आघाडी तयार करत आहे. हरियाणातील काही भागांत बसपाला दलित मतदारांचे भक्कम मताधिक्य आहे, तर काही भागांत आयएनएलडीला जाट समाजाचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही युती काँग्रेस आणि भाजपापुढे कडवे आव्हान उभे करणार यात तिळमात्र शंका नाही. एकुणच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतही तिरंगी चौरंगी लढती झाल्या असल्या तरी खरी लढत ही भाजपा आणि काँग्रेसमध्येच झाली होती. विधानसभेचे गणित वेगळे असते. यामुळे तिरंगी लढतीचा कोणाला फायदा होतो हेसुद्धा महत्त्वाचे असेल. आम आदमी पक्षाच्या (आप) प्रवेशाने राजकीय समीकरण बदलू शकते. याशिवाय, दुष्यंत चौटाला यांचा ’जननायक जनता पार्टी’ (जेजेपी), अभय सिंह चौटाला यांचा ’इंडियन नॅशनल लोकदल’ (आयएनएलडी), गोपाल कांडा यांची ’हरियाणा लोकहित पार्टी’ (एचएलपी), मायावतींची बहुजन समाज पार्टी (बसप), हे कमी वाटावे की काय म्हणून अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीनेदेखील मुस्लीम-यादवबहुल उत्तर प्रदेशला लागून असलेल्या पूर्व हरियाणातील 20 जागा लढवण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष भाजपा आणि काँग्रेसला घाम फोडणार हे निश्चित. हरियाणातील एकूणच राजकीय रणधुमाळी पाहता भाजप व मित्रपक्ष बहुमताकडे वाटचाल करतील की सत्ता घालवेल कारण काही सोन्याचा गुण काही सवागीचा गुण म्हणजे मोठी कामे करत असतांना मोठ्या लोकांचे (स्वबळाचे) सहकार्य होते तसे छोट्या लोकांचे (छोटा पक्ष सोबत घेणे) सहकार्य देखील घ्यावेच लागते अन्यथा परिणाम विपरित होता त्यामुळे हरियाणात भाजपाला असा फॉर्म्युला वापरावाच लागणार!

Leave a comment