एक आणि एक दोनच होतातएक आणि एक अकरा कसे?

अग्रलेख

काही दिवसापुर्वी ‘शेअर मार्केट मध्ये जास्त नफा मिळत असल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक केली या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती.यामध्ये पैसे गुंतवा व भरपूर नफा मिळवा, असे अमिष दाखवून आरोपीने फिर्यादीस ऑनलाईन व नगदी रोख पैसे घेऊन कुठलीही रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केलेली असल्याने कार्यवाही झाली होती या अगोदरही वेगवेगळ्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या त्या ऑनलाईन फसवणुकीच्याच होत्या याच्या मुळाशी गेले तर इतकेच लक्षात येते की कमी कालावधीत झटपट श्रीमंत होता कसे येईल याकडे आजचा तरुण वर्ग पाहत आहे. यश मिळवायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही ही ओळ आता अंधुक होत आहे आता यश मिळवायचे असेल तर जंगली रम्मी खेळा, ऑनलाईन गुंतवणुक करा, शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा मिळतो त्यामुळे शेअर मार्केटबद्दल/जंगली रम्मी बद्दल/ किंवा कोणत्याही ऑनलाईन व्यवसायाबद्दल कसलीही पुर्वमाहिती नसतांना किंवा अभ्यास नसतांना कुणाच्यातरी सांगण्यावरुन म्हणजे आयजीच्या जिवावर बायजी हे तत्वज्ञान दाखवून पैसे गुंतवणे स्वतःकडे पैसे नसतील तर दुसर्‍यांकडून हातउसने वा व्याजाने घेणे ते पैसे फेडू न शकल्याने घरच्यांना त्रास होणे इतकेच काय तर शेवटी टोकाची भूमिका घेवून जिवन संपविणे असेच पर्याय सध्या या वेगाच्या युगामध्ये पहायला मिळत आहेत. तुमच्या भविष्यासाठी किती पैशांची आवश्यकता असते, हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही त्या हिशेब नेमका कसा लावाल? ते कमावायचे कसे? याचा कुठलाही आढावा न घेता अती घाई संकटात नेई अशा प्रकाराकडे गांभीर्याने न पाहता आजकाल युवावर्ग निर्णय घेवू लागला आहे. काही वर्ष मागे गेलो असता घरात लँडलाईनफोन असणं म्हणजे चैनीची बाब ठरवली जात होती, तर 30 वर्षांपूर्वी घरात टीव्ही असणं हीदेखील एक मोठी बाब होती कारण या गोष्टी केवळ सरकारी अधिकारी आणि श्रीमंतांकडेच पहायला मिळत होत्या.लोकांचं राहणीमान त्याचा दर्जा आता बदलला आहे पैसा नसला तरी काहीही उद्योग करुन चैनीच्या वस्तू खरेदी करणे म्हणजे एलसीडी टीव्ही, डबल डोअरचा फ्रीज, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, लॅपटॉप, दुचाकी, वीकेंडला चांगल्या हॉटेलात जेवण या बाबी जवळजवळ 70 टक्के लोकांकडे आता पहायला मिळतात केवळ घर आणि कार अशा वास्तु आणि वस्तु काही ठिकाणी अपवाद असतात. जर तुम्हाला महागाईच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक मोबदला हवा असेल तर मेहनत देखील वाढविली पाहिजे उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढविले पाहिजे. आरोग्य, शिक्षणासाठी सरकारने काढलेल्या योजनांचा लाभ घेता आला पाहिजे. पैशाची बचत देखील केली पाहिजे इतकेच काय तर कर्ज काढतांना ते देखील राष्ट्रीयकृत बँकेचे कमी व्याजदराचे काढायला पाहिजे.कर्ज शक्य असेल तर काढू नये कारण कर्ज देणारी संस्था किंवा व्यक्ती मुद्दल व्याजासहित वसूल करते.कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी कर्जदार रजा न घेता कष्टच करीत राहतो.त्यामुळे जीवनाचा आनंद हरवून जातो.पण कर्ज काढावेच लागले तर ते काढल्यावर किंवा ते काढण्याच्या आधीच उत्पन्नाचे स्रोत वाढवा. पत्नीला किंवा आपल्या घरी जे कोणी त्यांच्या वयोमानानुसार व्यक्ती असतील त्यांना त्यांच्या आवडीचे व्यवसाय कमी भांडवलामधील टाकून द्या. नवीन घरगुती व्यवसाय करण्यास प्रवृत्त करा किंवा तुम्ही करत असलेले काम करत करत पार्ट टाईम म्हणजे सकाळी दोन तास- तीन तास काही चहाच्या स्टॉल पासून उद्योग केले तर निश्चितपणे उत्पन्न वाढेल कर्जाचे हफ्ते भरणे शक्य होईल. घरगुती शिकवणी घेणे, इन्शुरन्स एजंट, किंवा अल्प भांडवली किंवा बिगर भांडवली व्यवसाय सुरू करा. आपली मेहनत, चिकाटी व व्यावसायिक कौशल्य व नितीमत्ता असेल तर या व्यवसायात जम बसेल उत्पन्न वाढले तर कर्ज लवकर फिटेल. शक्य असेल तर चैनीच्या वस्तू खरेदीच करू नका.साधे जीवन जगा सारखे हॉटेलिंग करणे, अनावश्यक वस्तूंची खरेदी करणे,फास्ट फूड, ब्रॅण्डेड कपडे व वस्तूंची खरेदी या गोष्टी कटाक्षाने टाळा. लग्न समारंभ, वाढदिवस, पूजा ,इतर सण साधेपणाने साजरे करा बर्‍याचदा समाजाच्या दबावाखाली , नातेवाईक लोक काय म्हणतील असा विचार करुन अनेकजण लग्नात खूप खर्च करतात पण ज्या लोकांना दाखवण्यासाठी आपण लग्न किंवा इतर कार्यक्रमात खर्च करतो त्या लोकांपैकी कितीजण संकटात आपल्या मदतीला धावून येतात? याचा विचार करा.अगदी साधेपणाने आनंदात आयुष्य जगणे शक्य आहे. शक्य झाले तर कर्जावर अधूनमधून शक्य असेल तितकी रक्कम जमा करा.मुद्दल कमी होऊन व्याजही कमी होईल.कर्ज लवकर फिटेल. अडचणीत सापडलेल्यांना शक्य तितकी मदत करा.आपण अशी सत्पात्री मदत केली तर आपल्याही जीवनात आश्चर्यकरकरित्या चांगल्या घटना घडतात पैसा खर्च करतांना विचार करुन करा कारण एका चुकीच्या निर्णयामुळंही तुम्ही संपूर्ण पैसा गमावण्याची दाट शक्यता असते. तसेच झटपट श्रीमंतीच्या मागे धावू नका, कष्टाला पर्याय नाही आणि कष्टाच्या पैशाची मजा काही औरच असते. अन्य मार्गाने कमावलेला पैसा रात्री झोप येवू देत नाही त्यामुळे एक आणि एक दोनच असतात एक आणि एक अकरा होवू शकत नाही याचे भान तरुणाईने राखायला हवे!

Leave a comment